Quick contact info

icon_widget_image Sunday-Friday: 9am to 5pm; Saturday: Closed icon_widget_image Metaforge Engineering (I) Pvt. Ltd S.No. 22/3, Nasik- Dindori Road, Mhasrul, Nasik-422004, INDIA icon_widget_image +91-253-2531585 +91-253-2530506 icon_widget_image mktg@metaforgeindia.com

Metaforge

प्रगतीचा मार्ग !

परवा रांजणगावला जाताना पाबळच्या Vidyan Ashram ला धावती भेट दिली. वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी तयार केलेले प्रकल्प बघितले. जेंव्हा सकारात्मक विचार केला जातो; तेंव्हा या समस्यांवर उपाय नक्की सापडतो. मुलांना दिशा दिली तर ते काय भन्नाट कल्पना काढतात हे जाणवले. तळमळीने शिकवणाऱ्या योगेश कुलकर्णी व त्यांच्या साथीदारांचे मनापासून कौतुक. ” Education through development ” यातून नवीन शोध लावण्यासाठी यांची टिम सदैव प्रयत्न करत असते व त्यातूनच आजपर्यंत कितीतरी लोकांचे जीवन बदलून गेले असेल.

आमच्याकडे साधारणपणे जुलैपासून कारखान्यात कामाचा लोड वाढत जातो. यावेळी एका विभागातील मशिनवरील काम एकदम वाढले. आता दोन पर्याय होते एकतर मशिन वाढवणे अथवा त्या मशिनवरचा भार कसा कमी करता येइल हे बघणे. पहिला पर्याय हा शेवटचा. आधी दुसऱ्या पर्यायावर विचार सुरू झाला. बऱ्याच वेळा यातूनच छान सुधारणा होतात. वेगवेगळे विचार येवू लागतात. ” याच मशिनवर का ? दुसरीकडे कुठे होइल ? प्रोसेसमध्ये काय बदल करता येतील ? हे असच कशासाठी ? ” असे प्रश्न सुरु झाले की उत्तर यायला सुरवात होते. सातत्याने सुधारणा करत आपण सध्याच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहणे महत्वाचे. अडचणी आल्या की नवीन मार्ग सुचत जातात. पण यासाठी अडचणी असाव्या लागतात व त्या दिसाव्या लागतात. नवीन सुधारणा होण्यासाठी हे आवश्यकच आहे.

मध्यंतरी एक गोष्ट वाचली. एका लेडीने थोडा अनुभव पाठीशी आल्यावर कॉंप्यूटर हार्डवेअरचे दुकान अशा ठिकाणी टाकले की जिथे आधीच ३-४ दुकाने होती. पण बघता बघता त्या बाईने शहराच्या चारही भागात दुकाने सुरु केली व ती सगळी दुकाने व्यवस्थित सुरु आहेत. त्या बाईना विचारले की बाकीच्या दुकानांसमोर तुमचा टिकाव लागणार नाही असे सर्वानी सुनवले असूनसुद्धा तुम्ही एक दुकान सुरु केले व त्यानंतर एकाचे चार केलेत या मागे काय रहस्य आहे ? त्यांनी फार छान उत्तर दिले .. मी दर सोमवारी दुपारी माझ्या जागेवर शांतपणे बसते. मागील आठवड्यात कुठे अडचण आली यावर विचार करते. त्यावर या आठवड्यात काय सुधारणा करायची ते लिहून काढते. त्यासाठी आराखडा बनवते व कामाला लागते. दर आठवड्याला होणाऱ्या सुधारणेतून कदाचित आज माझ्याकडे जास्त ग्राहक येत असावेत. प्रगतीचा मार्ग हा सतत होणाऱ्या सुधारणेत दडला असेल.

निरसपणे जगण्यापेक्षा, डोक्याला चालना देत नवनवीन कल्पना येवू दिल्या व त्या यशस्वीपणे राबवल्या तर स्वतः व आपल्या बरोबरीच्या सर्वानाच त्याचा फायदा होइल. कदाचित एका छोट्याश्या कल्पनेत जगावर हुकमत गाजवण्याची शक्ती असेल.

Post a Comment